फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील उपनगर भागात फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संजय रघुनाथ जावळे (राहणार: रेल्वे ट्राक्शन, एकलहरा रोड) याने सदर तरुणीला याआधी धमक्या दिल्या होत्या. तरुणीचा एका मुलासोबत असलेला फोटो तिला दाखवला आणि “ तुझ्या पप्पाला काही माहित नाही, मला माहित आहे.” असे बोलून “तू जर जास्त शहाणपणा केला तर त्या मुलासोबतचे तुझे फोटो मीच व्हायरल करून टाकेल” अशी धमकीही दिली. या प्रकारामुळे सदर तरुणी खचून गेली आणि नैराश्यापोटी तिने राहत्या घरातच पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे संजय रघुनाथ जावळे याच्यावर आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.