फी वसुलीची मनमानी करणाऱ्या शाळांवर आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या लोकसेवकांवर होणार कारवाई!

नाशिक कॉलिंग अपील – तुमच्याही मुलांच्या शाळेतून मनमानी पद्धतीने फी वसुलीचा तगादा लावला जात असेल तर आमच्या फेसबुक पेजवर मेसेज करून संपर्क साधा.

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांसोबतच मराठी माध्यमाच्या शाळासुद्धा पालकांना फी भरण्यासाठी मनमानी करत असल्याच्या तक्रारी मागील अनेक दिवसांपासून येत आहेत. या काळात शाळा या ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा वापर करत असल्याने शाळांचा खर्च कमी झाला आहे. त्यामुळे ऑनलाईन क्लासेसचेच पैसे घेतले जावेत अशी मागणी पालक करत होते. मात्र शाळांकडून पूर्ण फी मागितली जात असल्याची बाब समोर येत असल्याने या प्रकाराविरोधात शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी “संबंधित शाळांचे लेखापरीक्षण करा.” असे शिक्षण विभागाला आदेश दिले आहेत.

नाशिकमधील काही शाळांकडून कोरोनाकाळातसुद्धा पालकांना फी वसुलीचा तगादा लावला जात असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. या शाळा शासनाने घालून दिलेल्या निर्देशांची पायमल्ली करत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यातील काही शाळा तर चक्क “लोन घ्या पण फी भरा” असं म्हणत असल्याच्या तक्रारी पालकांकडून केल्या जात आहेत. त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणजे या सगळ्या प्रकाराविरोधात पोलीस तक्रार घेत नाहीत. उलट शाळांशी संगनमत करून पालकांवरच खोटे गुन्हे दाखल करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

अशा प्रकारची वागणूक देणाऱ्या शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. यासोबतच आपल्या कर्तव्याचे भान न ठेवणाऱ्या लोकसेवक तथा पोलिसांवरसुद्धा निलाबांची कारवाई करण्यात यावी. असे निवेदन बच्चू कडू यांना देण्यात आले होती. तसेच या तक्रारी पालकांनी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या लक्षात आणून दिल्यांनतर अखेर बच्चू कडू यांनी अशा शाळांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.