प्रत्येक तालुक्यात कायमस्वरूपी ऑक्सिजन सेंटरची निर्मिती करावी – पालकमंत्री भुजबळ

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील तालुकास्तरावर बेडची संख्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असून प्रत्येक तालुक्यात कायमस्वरूपी ऑक्सिजन सेंटर निर्मिती करण्यात यावी व मुबलक ऑक्सिजन बेडची उपलब्ध करून देणेयात यावेत, अशा सूचना आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड १९ चा आढावा व उपाययोजनांबाबत दिंडोरी येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित महाविद्यालयाच्या सभागृहात दिंडोरी, कळवण, सुरगाणा, पेठ या तालुक्यांची कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार डॉ.भारती पवार, आमदार नितीन पवार, श्रीराम शेटे, सुरगाणा पंचायत समिती सभापती मनीषा महाले, उपसभापती इंद्रजित गावित, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा कृषी अधिकारी संजीव पडवळ, प्रांताधिकारी संदीप आहेर, विजयकुमार भांगरे, तहसीलदार बंडू कापसे, संदीप भोसले, विजय सूर्यवंशी, कैलास पवार, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, श्री. बहिरम, नम्रता जगताप, रत्नाकर पवार,तालुका नोडल अधिकारी डॉ.प्रशांत खैरे, डॉ.समीर शेख,डॉ. आबीद अत्तार,डॉ.पांडुके, तालुका अधिकारी डॉ.सुधीर पाटील, डॉ.कोशिरे, डॉ. मोतीलाल पाटील, डॉ.रणवीर यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की,  तालुका निहाय आपत्ती व्यवस्थापन समित्यांची स्थापना करून कोविड बाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यात यावी. कोमॉर्बीड रुग्णांचा शोध घेऊन त्यांना औषध उपचार करून लक्ष ठेवण्यात यावे.

प्रत्येक तालुक्यात गावनिहाय तपासणी मोहीम राबविण्यात यावी.

लोकांच्या हाताला काम मिळण्यासाठी उद्योग व कंपन्या सुरू ठेवाव्या लागणार आहेत. अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी हळू हळू पाऊले   टाकावे लागत आहेत. उद्योग क्षेत्रात होत असलेल्या कोरोनाच्या संसर्गास रोखण्याच्या दृष्टीने  कंपनी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचे दररोज स्क्रिनिंग करावे. कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करून आढळलेल्या रुग्णांची माहिती प्रशासनाला द्यावी; रुग्णांची माहिती लपविण्यात येऊ नये, याबाबत कंपन्या व उद्योगांना सूचना देण्यात याव्यात. रूग्णसंख्या वाढणार नाही याबाबत दक्षता घेऊन उपाययोजना कराव्यात. दिंडोरी मध्ये तात्काळ सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम सुरू करण्यात यावी, असेही निदेश पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिले आहेत.

कंटेंटमेन्ट झोनचा एरिया संपूर्ण प्रतिबंधित करण्याबरोबरच मास्कचा वापर न करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी. असे सांगून पालकमंत्री भुजबळ म्हणाले, पर्जन्यमान कमी असल्याने जिल्ह्यात सध्या पाणी टंचाईची परिस्थिती असल्याने त्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे कोरोनासोबतच जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे सध्या पाणी टंचाईचे मोठं सावट आहे. त्यामुळे शेतकरी देखील चिंतेत आहे.

अन्न सुरक्षा योजनेचा लाभ अधिक लोकांना मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असून या योजनेत अधिक नागरिकांचा समावेश करण्यासाठी प्रयत्नशील असून कोविड ची परिस्थिती सुधारल्यांनातर यावर प्राधान्याने निर्णय घेण्यात येईल. तालुका रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय यात समन्वय राहण्यासाठी कॉल सेंटर अथवा हेल्प लाईनचा उपयोग करावा, अशाही सूचना यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.