प्रतिबंधित क्षेत्रात मुक्तसंचार केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे कोरोनाचा आणखी प्रसार होण्याचा धोकासुद्धा वाढत चालला आहे. वाढत्या कोरोनाबाधीतांच्या संख्येप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्र सुद्धा वाढतांना दिसताय. हॉटस्पॉट ठरलेल्या भागात फिरण्यासाठी मनाई असतानासुद्धा नागरिक बेफिकीरपणे फिरत असल्याचं चित्र दिसतंय. यावर उपाययोजनेचा एक भाग म्हणून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर आता फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नाशिकच्या हॉटस्पॉट ठरलेल्या भागात संयुक्त दौरा केला. शुक्रवारी (दि.१०) झालेल्या या संयुक्त दौऱ्यात नियमांचे पालन न करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या भागात नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी आणि रुग्णसंख्या लवकरात लवकर आटोक्यात यावी यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे.