धक्कादायक : पोलिसात तक्रार केली म्हणून नातवाने केला आजोबांचा खून!

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे आजोबांना घराबाहेर जाण्यास नातवाने अडवल्याने, आजोबांनी थेट पोलिसांकडे तक्रार नोंदवली. याचाच राग येऊन नातवाने चक्का आजोबांचा खून करून, तोंडाला चिकटपट्टी लावून, हात-पाय बांधून मृतदेह नाल्यात फेकून दिल्याचा गुन्हा उघडकीस आला आहे.गिरणारे जवळील धोंडेगावात राहणाऱ्या रघुनाथ श्रवण बेंडकुळे (वय ७०) या वृद्ध इसमाचा नातू किरणने खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

वय झाल्याने आजोबांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे सांगून, ते विनाकारण घराबाहेर तसेच मंदिरात जातात म्हणून त्यांना किरण लोखंडी साखळीने घरात बांधून ठेवत होता. ही माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. याच त्रासाला कंटाळून महिनाभरापूर्वी रघुनाथ यांनी हरसुल पोलिस ठाण्यात नातू किरण विरोधात तक्रार दिली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून संशयित आरोपी किरण याने रविवारी (दि.११) रोजी रात्री आजोबा रघुनाथ घराबाहेर झोपलेले असताना तोंडाला घट्ट चिकटपट्टी लावून, हात-पाय लोखंडी साखळीने बांधले.व त्यांना मारुती ओमनी (क्र.एमएच१५ इबी३९१९) या गाडीत टाकले‌ असून, गाडी धोंडेगावमार्गे मखमलाबादकडून आडगाव शिवारातील गावात ओढा असलेल्या नाल्याकडे नेऊन मृतदेह नाल्यात फेकला.

आडगाव पोलिसांना दुसऱ्या दिवशी वृद्ध इसमाचा मृत्यदेह सापडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान खान तसेच सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, हवालदार सुरेश नरवाडे, दशरथ पागी, गणपत ढिकले, देविदास गायकवाड इत्यादी कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.व मृतदेह पाण्यातून बाहेर काढला असता, घातपाताचा प्रकार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला. आणि वृद्ध व्यक्तीचा खून झाल्याची खात्री पटली.व पोलिसांच्या तपासातून पुढे सोमवारी (दि.१३ ऑक्टोबर) रोजी याप्रकरणी पोलिसांनी संशयित नातू किरण निवृत्ती बेंडकुळे (वय २३) यास अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेली मारुती ओमनी कार देखील जप्त करण्यात आली आहे.