पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी : अवघ्या एका तासात गुन्हेगारांना केले गजाआड!

नाशिक (प्रतिनिधी) : रविवारी पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी बळजबरीने खिशातील तीन हजार रुपये हिसकावून घेत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना भद्रकाली परिसरात घडली. या घटनेनंतर गुन्हा दाखल होताच गुन्हे शोध पथकाने अवघ्या एकाच तासात गुन्हेगारांचा शोध लावत कौतुकास्पद कामगिरी केली. गुन्हे शोध पथकाला गुन्हेगारांची माहिती मिळताच त्यांनी आरोपी शंकर रिडलॉन आणि नितीन पवार यांना त्यांच्या घरीच अटक केली.

रविवारी (दि.१९) पहाटे साडेपाच च्या सुमारास गौरव परदेशी आणि त्यांचा मित्र मोसिन सैय्यद हे सारडा सर्कल कडे जात असतांना कावेरी बस स्टॉप जवळील चहा टपरीजवळ पाठीमागून पांढरऱ्या ऍक्टिवा वर दोन जण आले. त्यांनी गौरव व मोसिन यांना दमदाटी केली. त्यानंतर गौरव यांच्याकडील ३ हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेतले आणि गौरव यांच्या फोन वरून कुणालातरी फोन लावून गौरव यांच्या पोटाला चाकू लावत “बकरा मिळाला, मारू का?” अशी धमकी दिली. यावरून भद्रकाली पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्ह्याचा तपास करत एका तासात गुन्हेगारांना पकडण्यात भद्रकाली पोलिसांना यश आले.