पालकांच्या लेखी संमतीनेच ५०% विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती !; शिक्षकांची टेस्ट होणार !

नाशिक (प्रतिनिधी): राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व आस्थापना टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर 23 नोव्हेंबर 2020 पासून इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरू होणार असल्याने कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करून घेण्यासाठी ग्रामीण व शहरी भागांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

कोविड विषाणूच्या अनुषंगाने 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा प्रत्यक्षपणे सुरू करण्यासाठी 10 नोव्हेंबर 2020 रोजीच्या परिपत्रकातील सुचनांच्या अधिन राहून शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार वरील वर्ग सुरळीतपणे सुरू करण्यासाठी महानगरपालिका हद्द वगळून उर्वरीत नाशिक जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर व महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी प्रशासन अधिकारी (शिक्षण) सुनीता धनगर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी  मांढरे यांनी सांगितले आहे.

यावेळी जिल्हाधिकारी  मांढरे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील 1324 शाळा 100 टक्के सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी 9 वी ते 12 वी पर्यंतच्या सर्व शिक्षकांच्या अँटीजन तपासण्या करणे अनिवार्य असून काही प्रमाणात लक्षणे असलेल्या शिक्षणकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात यावी. शाळांमध्ये पालकांच्या लेखी संमतीने 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती राहणार असल्याने शाळांची स्वच्छता, नियमित सॅनिटायझेशन, सामाजिक अंतर या गोष्टी पालन करण्यात याव्यात. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील देखील शाळा सुरू होणार असल्याने या भागातही कोविडबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होईल यासाठी नोडल अधिकारी व सर्व संबंधित शाळांनी लक्ष देणे आवश्यक आहे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी  मांढरे यांनी दिल्या आहेत.

शाळा सुरू होण्याच्या पहिल्या टप्प्यात इंग्रजी, गणित व विज्ञान हे विषय प्रत्यक्षपणे शाळेत शिकवण्यात येणार असून उर्वरित विषय ऑनलाइन पद्धतीनेच शिकवण्यात येणार आहेत. याचसोबत पालकांच्या मागणीनुसार वाहतूक व्यवस्था पुरविण्यासाठी आवश्यकतेनुसार परिवहन विभागाची मदत घेण्यात येणार आहे. शाळा सुरळीतपणे सुरु राहण्यासाठी स्थानिक प्रशासन व आरोग्य यंत्रणामार्फत यथोचित सहकार्य करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी  मांढरे यांनी सांगितले आहे.