पान टपरीमध्ये तलवारींचा साठा करून ठेवणाऱ्या त्या युवकाला अटक!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमधील सिन्नर शहरातल्या आडवा फाटा या परिसरात असलेल्या एका पानटपरीत १८ धारदार तलवारींचा साठा आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या शोध पथकाने संशयितास अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी मयूर बलक (रा. सिन्नर) याने आडवा फाटा येथे असलेल्या स्वतःच्या पान टपरीच्या खालील बाजूला हत्यारे लपवली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी टपरीची पाहणी केली तेव्हा टपरीच्या खालच्या बाजूला खाकी रंगाच्या खोक्यामध्ये १८ धारदार तलवारी आढळून आल्या. त्यानंतर संशयिताची चौकशी केली असता परराज्यातील मित्राकडून ही शस्त्रे विकत घेतली असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली आहे.