परदेशात उच्चशिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 1 जून रोजी होणार  लसीकरण

नाशिक (प्रतिनिधी): भारतातून परदेशात जाणाऱ्या नागरिकांना लसीकरण करून घेणे अनिवार्य करण्यात आले असून या परिस्थितीत ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण मंगळवार, 1 जून 2021  रोजी  विशेष बाब म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात  येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

यासंदर्भात लसीकरण मोहिमेचे घटना व्यवस्थापक तथा उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांनी जारी केलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले की, महाकवी कालीदास कलामंदिर येथे  मंगळवार,1 जून रोजी दुपारी 12.00 वाजेपासुन होणाऱ्या या लसीकरणासाठी विद्यार्थ्यांनी  । – 20  किंवा DS- 160 फॉर्म , ॲडमिशन निश्चित झाल्याचे पत्र, आयकार्ड आणि पासपोर्ट परवाना सोबत आणावे व लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी सूरज मांढरे  केले आहे.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात विचार करणे बाबत आवाहन केले होते.   पुणे व मुंबई महानगरपालिका क्षेत्रात त्या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यातील परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परदेशातील नामवंत विद्यापीठात शिक्षणासाठी जाणे ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्वाची बाब असून केवळ लसीकरणाच्या अभावी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितल्याचे या प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

शंभर विद्यार्थ्यांना देण्यात येणार ‘कोविडशिल्ड’ लस:
परेदशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नाशिकमध्ये अंदाजे शंभर पर्यंत आहे. अमेरिका युरोप व इतर बहुसंख्य देशांमध्ये ‘कोविडशिल्ड’ ही लस मान्यताप्राप्त असल्यामुळे या विद्यार्थ्यांना कोविडशिल्ड लस देण्यात येणार आहे. लसीकरणाकरिता आवश्यक असणारी लस नाशिक महानगरपालिकेला जिल्हा लस भांडार येथुन उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी कळविले आहे.