पन्नास टक्के उपस्थितीत आजपासून वरिष्ठ महाविद्यालये सुरु

नाशिक (प्रतिनिधी): विद्यार्थी आणि पालकांसह अनेक विद्यार्थी संघटनांकडून महाविद्यालये सुरू करण्याची मागणी केली जात होती अनेक आंदोलन देखील महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला होता..अखेर आजपासून विद्यार्थ्यांच्या 50%उपस्थितीत वरीष्ठ महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत..

नाशिकसह राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालये आजपासून सुरू झाली आहेत. नाशिक शहर व जिल्ह्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित ८० महाविद्यालये सुरू झाले आहेत. शाळांप्रमाणेच सुरुवातीला ५० टक्के उपस्थितीत विद्यार्थ्यांना एकाच वेळी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. नाशिक शहरासह, जिल्ह्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित पारंपरिक शाखांच्या वरिष्ठ महाविद्यालयांबरोबर एमबीए, एमसीए, इंजिनिअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांची महाविद्यालये आज पासून सुरू झाली आहेत. नाशिकमध्ये विविध शाखांची एकूण ८० महाविद्यालये असून ५० टक्के उपस्थितीसह ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये ,यासाठी युजीसी आणि राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सर्व महाविद्यालयांना कराव लागणार आहे.