पंधरा हजारांची लाच घेताना पोलिस हवालदार अटकेत

नाशिक (प्रतिनिधी): गुन्ह्यात अटक करून तत्काळ जामीन मिळवण्यास मदत करण्याच्या मोबदल्यात १५ हजारांची लाच स्वीकारताना अभोणा पोलिस ठाण्याचा हवालदार परशराम लक्ष्मण गांगोडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या विरोधात आणि इतर संशयितांच्या विरोधात अभोणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यात अटक करून जामीन मिळण्यास मदत करण्याच्या मोबदल्यात हवालदर परशराम गांगोडे याने २० हजारांची लाच मागितली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी सापळा लावला. तडजोडीअंती १५ हजारांची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहाथ अटक केली. अभोणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.