पंचवटीत ग्राहकाने महिलेच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र ओरबाडले !

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील पंचवटी परिसरातील एका महिला दुकानदाराच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र दुकानात आलेल्या ग्राहकाने ओरबाडल्याची घटना घडली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता, पोलिसांनी तपास करून, त्वरित घटनेच्या दुसऱ्याच दिवशी संशयित आरोपीस अटक केली आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कल्पना ज्ञानेश्वर राऊत (वय ३८) या पंचवटी परिसरा येथील हिरवाडीतील त्रिमूर्ती नगर, घर क्रमांक ११३ येथील रहिवाशी आहेत. तसेच कल्पना यांचे हिरवाडी, पंचवटीत किराणा दुकान आहे. गुरुवारी (दि. २४ डिसेंबर) रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी त्यांचे किराणा दुकान बंद करत होत्या. दरम्यान, संशयित आरोपी मोहन पांडुरंग गावित (वय २९, रा.पाळसन, ता.सुरगाणा जि. सुरगाणा) याने दुकानात येऊन, फेअर अँड लव्हली ची मागणी केली. यानंतर राऊत यांनी त्यास ती देऊन, त्याने दिलेले १० रुपये दुकानातील गल्ल्यात ठेवत होत्या. दरम्यान, संशयिताने संधी साधत, फिर्यादी यांच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र हिसकावून तोडण्याचा प्रयत्न करून, नुकसान केले. २५ हजार किंमतीची ७ ग्रॅम वजनाचे मणी असलेली मणी मंगळसूत्राची ही माळ होती.