नोकरदार महिलेने ८४ वर्षीय वृद्धेस केली मारहाण; ३ लाखांचे कानातले घेऊन पोबारा !

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील टाळकीरोड येथे असलेल्या वृद्ध महिलेच्या घरी एक नोकरदार महिला घरकामासाठी होती. दरम्यान, या संशयित महिलेने चोरीच्या हेतूने वृद्ध मालकीणीस मारहाण केली व ३ लाख किमतीचे कानातले हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उमा बंकूबिहारीं मलीक (वय ८४) या बंकू बुटिर बंगलो क्रमांक ४, नेताजी सुभाष कॉलनी, रामदास स्वामी नगर टाकळीरोड येथे राहतात. वृद्ध महिलेच्या घरी घरकामासाठी एक महिला मंगल हिरामण विख (वय ४०, रा.श्री विघ्नेश्वर अपार्टमेंट, जेलरोड) ही येत होती. दरम्यान, (दि.१३ जानेवारी) रोजी साडे सात वाजेच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरी संशयित महिलेने फिर्यादीस गळ्याला दाबून ढकलून दिले. तसेच तोंडावर उशी दाबून मारहाण केली. तर, फिर्यादी यांचे ३ लाख किमतीचे डायमंडचे कानातले हिसकावून काढून घेतले. संशयित महिलेस पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. तर, फिर्यादी यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.