नाशिक: हृदयद्रावक… रुग्णवाहिका चालकावर मुलाचाच मृतदेह वाहण्याची वेळ

नाशिक: हृदयद्रावक… रुग्णवाहिका चालकावर मुलाचाच मृतदेह वाहण्याची वेळ

नाशिक (प्रतिनिधी): एका रुग्णवाहिका चालकावरच स्वत:च्या मुलाचा मृतदेह वाहण्याची वेळ आली..

नाशिक जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे…

सटाणा शहराजवळील यशवंतनगर येथे दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने २२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना रात्री साडेअकरा वाजता घडली.

अपघात घडल्यानंतर स्थानिक युवकांनी शासकीय रुग्णवाहिकेला (१०८) फोन केला असता घटनास्थळी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका तात्काळ हजर झाली…

मात्र अपघातात मृत झालेल्या युवकाचे वडील स्वत: रुग्णवाहिकेचे चालक निघाल्याने पोटच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याचे बापाच्याच लक्षात आल्याने घटनास्थळी बापाचा आक्रोश पाहून अनेकांनी अश्रुंना वाट मोकळी करून दिली…

रविवारी रात्री साडेअकरा वाजता सटाण्याच्या यशवंतनगर येथे अपघात झाल्याचा मोठा आवाज झाल्याने यशवंतनगरच्या युवकांनी रस्त्यावर धाव घेतली. हीरो कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल रस्त्याच्या मधोमध छिन्नविछिन्न अवस्थेत होती. तर रस्त्यालगत दूरवर फेकला गेलेला एक युवक रक्ताच्या थारोळ्यात आढळला. उपस्थित युवकांनी अपघाताची खबर सटाणा पोलिसांना कळविली असता, अपघातस्थळी पोलिसांसह 108 क्रमांकाची शासकीय रुग्णवाहिका दाखल झाली.

रुग्णवाहिका चालक अपघातातील जखमी युवकाच्या जवळ गेला असता तो युवक त्यांचाच मुलगा असल्याचे समजल्यावर त्यांना प्रचंड धक्का बसला. अपघातात जखमी झालेला युवक आपला मुलगाच असून तो जागीच मृत झाल्याचे त्यांना निदर्शनास आल्यावर त्यांनी फोडलेला हंबरडा पाहून उपस्थितांनाही अश्रु आवरता आले नाहीत.

सागर श्रावण खैरनार (वय २२ रा.वासोळ ता.देवळा) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून तो सटाणा शहरातील सिम्स हॉस्पिटल येथे नोकरी करत होता. तर त्याचे वडील श्रावण खैरनार हे सटाणा ग्रामीण रुग्णालयात 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर चालक आहेत. सटाणा शहर व परिसरात होणार्‍या अपघातांमधील जखमी रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यात पोहचविणार्‍या खैरणार यांना आज त्यांच्याच मुलाच्या अपघातात घटनास्थळी मदत करण्याची वेळ आली.

अपघातात त्यांचा मुलगा सागर गंभीर जखमी झाल्याने उपचारांच्या आधीच त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील करीत आहेत.