नाशिक: हुंड्यासाठी वारंवार होणाऱ्या छळामुळे विवाहितेची आत्महत्या; तीन जणांवर गुन्हा दाखल

नाशिक: हुंड्यासाठी वारंवार होणाऱ्या छळामुळे विवाहितेची आत्महत्या; पतीसह तीन जणांवर गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): लग्नात एक लाख रुपये हुंडा दिला नाही म्हणून वारंवार होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली.

या प्रकरणी पतीसह सासरच्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पीडित विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्यांची मुलगी सोनाली दि. 14 फेब्रुवारी 2020 ते दि. 7 जून 2022 या कालावधीत नांदूर नाका येथील निसर्गनगर येथील कांबळे गल्‍ली येथे सासरी नांदत होती.

त्यावेळी पती अभिजित कांतीलाल देवकर, सासू अनिता कांतीलाल देवकर व दीर संतोष कांतीलाल देवकर या तिघांनी संगनमत करून “तुझ्या आईवडिलांनी लग्नामध्ये भांडे, संसार, सोन्याची अंगठी, व्यवसाय व घर बांधण्यासाठी एक लाख रुपये हुंडा दिला नाही,” असे म्हणून पीडित विवाहितेशी नेहमी भांडण उकरून काढत शिवीगाळ केली, तसेच तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन माहेरून एक लाख रुपये घेऊन ये, असे तगादा लावला.

वारंवार होणार्‍या या त्रासाला कंटाळून विवाहितेने दि. 7 ते 8 जूनदरम्यान सासरी आत्महत्या केली. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पतीसह सासूला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.