नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागात मेगा भरती!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरात कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे महापालिकेकडे असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे. महापालिकेकडे असलेले आरोग्य कर्मचारी निरंतर काम करत असून त्यांना तात्पुरती विश्रांती देण्यासाठी पर्यायी कर्मचारीच उपलब्ध नाहीत. त्यामुळे महानगरपालिकेने ७६१ पदांची मानधन तत्वावर मेगा भरतीची प्रक्रिया सुरु केली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागात ही भरती होणार असून तीन महिन्यांसाठी किंवा गरजेनुसार सहा महिन्यांपर्यंत कर्मचार्यांची नियुक्ती होणार आहे.

नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर मुबलक मनुष्यबळाची गरज आहे. म्हणून महापालिकेने तातडीची बाब म्हणून मेगा भरती प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये तज्ञ डॉक्टरांपासून, फिजिशियन, रेडीओलॉजिस्ट, एमबीबीएस, मानसोपचार तज्ञ, भूलतज्ञ, बीएएमएस ते अगदी एएनएमपर्यंत भरती मोहीम राबवण्यात येत आहे. यात २५० पदे स्टाफ नर्ससाठी आहेत, तर पदवीधरांसाठी १०० पदे आहेत. ५० वैद्यकीय अधिकारी, मल्टी स्कील हेल्थ वर्कर साठी १००, बीएएमएस साठी १०० अशा जागा उपलब्ध आहेत.