नाशिक: पीएनबी घोटाळा- मेहुल चोकसीची इगतपुरीतील ९ एकर जमीन जप्त

नाशिक: पीएनबी घोटाळा- मेहुल चोकसीची इगतपुरीतील ९ एकर जमीन जप्त

नाशिक (प्रतिनिधी): पीएनबी घोटाळ्याप्रकरणी मेहुल चोकसी आणि त्याच्या समूहाच्या एकूण १२१७ कोटींची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्यानंतर आयकर विभागाने आता त्याची इगतपुरीतील मुंढेगावात असलेल्या बळवंतवाडीमधील ९ एकर २८ गुंठे बेनामी जमीन जप्त केली आहे.

चोकसी तपास यंत्रणांना गुंगारा देत असून अद्याप भारतात परतलेला नाही. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली आहे.

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी गीतांजली जेम्स समूहाच्या चोकसीची आत्तापर्यंत १९ हजार कोटी रुपयांची संपत्ती सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी आणि आयकर विभाग यांनी मिळून जप्त केली आहे.

चोकसी याचे मुंबईमधले फ्लॅट्स, कोलकाता येथील मॉल आणि हैदराबादमधील ज्वेलरी पार्क आयकर विभागाच्या ताब्यात असून त्यात मुंबईतील १५ फ्लॅट‌्स, १७ ऑफिसेसचा समावेश आहे.

तसेच हैदराबादमध्ये जेम्स एसइजी, कोलकातामधील शॉपिंग मॉल, अलिबागमधील फार्म हाउस आणि महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील २३१ एकर जमिनीवर टाच आणली आहे. आता आयकर विभागाने प्रोहिबिशन ऑफ बेनामी प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन अॅक्ट अंतर्गत बेनामीदार मेसर्स नाशिक मल्टिसर्व्हिसेस एसइझेड लिमिटेडच्या नावे आणि बेनिफिशियल ओनर मेसर्स गीतांजली जेम्स लि.ची मालमत्ता जप्त केली आहे. बळवंतवाडी, मुंढेगाव (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथील जमीन पूर्णपणे केंद्र सरकारच्या सर्व भारमुक्तनिहित असतील आणि अशा जप्तीसंदर्भात कोणतीही भरपाई देय असणार नाही, असेही आयकर विभागाने हटले आहे.