नाशिक जिल्ह्यातील उद्योगांना पुन्हा मिळाली चालना!

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात तीन महिन्यांसाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र आता अनलॉक करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा उद्योग व व्यवसायांचे काम सुरू झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील छोटे, मोठे व मध्यम स्वरूपाचे १५ हजार उद्योगांचे कामकाज सुरु झाले आहे. नाशिक जिल्हा हा सध्या १०० टक्के उद्योग व्यवसाय चालू असलेला एकमेव जिल्हा म्हणून चर्चेत आहे.

या उद्योगांना परवानगी मिळाल्यानंतर देखील अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. सुरुवातीला कामगार हे फक्त घर ते कंपनी एवढाच प्रवास करू शकत होते. आता मात्र, दुचाकीचा वापर देखील करता येणार आहे. राज्य शासनामार्फत लॉकडाउनच्या शेवटच्या टप्प्यात उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, अटी व शर्ती या फारच जाचक असल्याची भावना उद्योजकांमधून व्यक्त झाली होती. तरी देखील सर्व आव्हाने पत्करुन, कोरोनावर‌ मात करत उद्योजक सुरक्षित उद्योग करत आहेत. उत्पादनच नाही तर निर्यातीकडे देखील उद्योजक सुवर्ण संधी म्हणून बघत आहेत. दुसऱ्या बाजूला जगातून चिनी उत्पादनांना भारतात होणारा मज्जाव पाहता लॉकडाऊन मध्ये सॅनिटायझर, डिस्पेंसर, थंड पाणी इत्यादी आवश्यक वस्तूंची उत्पादने नाशिकमधून निर्यात केली गेली. अंबड येथील सॅनसनसारख्या कंपनीने हॉलंड आणि युरोपात ऑटोमेटेड अॅन्ड सॅनिटायझेशन मशीन निर्यात केली. उद्योजक मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. म्हणूनच जिल्ह्यात शंभर टक्के उद्योग सुरू असणे ही बाब शक्य झाली‌ व उल्लेखनीय आहे.