नाशिक: “त्या” चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या मृत्यूचे गूढ उकलले; धक्कादायक बाबी समोर…

नाशिक: “त्या” चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या मृत्यूचे गूढ उकलले; धक्कादायक बाबी समोर…

नाशिक (प्रतिनिधी): चायनिज पदार्थ विकणार्‍या इसमाच्या मृत्यूचा उलगडा करण्यात अंबड पोलिसांना यश आले आहे.

घरगुती वाद मिटविण्याच्या प्रयत्नात पत्नीसह तीन जणांकडून झालेल्या मारहाणीत जखमी पतीचा मृत्यू झाल्याची घटना सिडकोत घडली.

या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कैलास बाबूराव साबळे (वय 41, रा. हेडगेवारनगर, त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक) याचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून, तसेच साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अधिकार्‍यांचा शवविच्छेदनानंतर दिलेला अभिप्राय व घटनेनंतरचे आरोपींचे कृत्य याचा तपास केला.

मयत कैलास बाबूराव साबळे याचे एका महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधावरून पत्नी निशा कैलास साबळे यांच्यात 12 जून रोजी रात्री घरगुती वाद झाले. त्यानंतर तो घरातून निघून गेला होता. त्याच्या पत्नीने या वादाबाबत त्याच्या मित्रांना कल्पना दिली व त्याला समजविण्यास सांगितले. हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करण्यासाठी संशयित आरोपी ज्ञानेश्‍वर ऊर्फ पिंटू नागू गायकवाड (रा. नाशिक), बाबू प्यारेलाल कनौजिया, रोहित नंदकुमार पवार (संपूर्ण पत्ता माहीत नाही) व मयताची पत्नी निशा साबळे (वय 35) हे सर्व जण दत्तमंदिराजवळील स्मशानभूमीजवळ आले व ते कैलास साबळे याला अनैतिक संबंधावरून झालेल्या भांडणाविषयी समजावून सांगत होते; मात्र तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता.

त्यावेळी संतापलेल्या आरोपी ज्ञानेश्‍वर ऊर्फ नागू गायकवाड, बाबू कनौजिया व रोहित पवार यांनी तेथे पडलेल्या लाकडी दांड्याने कैलास साबळे याच्या डाव्या हाताच्या दंडावर, पायावर, मांडीवर मारहाण केली, तसेच त्याची पत्नी निशा हिने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील निशाची एक लाथ कैलास साबळेच्या अवघड ठिकाणी लागली. तिने नंतर त्याला ढकलले. त्यात त्याच्या डोक्याला मार लागला. या मारहाणीत तो जखमी झाली व त्यातच त्याचा मृत्यू झाला. संशयितांचा कैलास याला मारहाण करून त्याचा जीव घेण्याचा कोणताही इरादा नव्हता; मात्र कैलासला झालेल्या शारीरिक जखमांमुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हरसिंग सीमा पावरा (वय 32) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निशा साबळेसह ज्ञानेश्‍वर गायकवाड, बाबू कनौजिया व रोहित पवार यांच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम 304, 34 प्रमाणे सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.