नाशिकहून दिल्लीसाठी पुन्हा विमानसेवा सुरु…

नाशिक (प्रतिनिधी) : स्पाइसजेटने नाशिकहून दिल्लीसाठी स्लॉट मिळवत, अवघ्या दीड वर्षानंतर नाशिकहून दिल्लीसाठी पुन्हा विमानसेवा सुरु केली आहे. पहिल्याच दिवशी या सेवेला प्रवाश्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. पहिल्या विमानामधून नाशिकहून दिल्लीला ९२ प्रवाशी गेले. तर, दिल्लीहून ८९ प्रवाशी नाशिकला आले.

दीड वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत जेट एअरवेजतर्फे नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरु करण्यात आली होती. या सेवेला प्रतिसादही चांगला मिळत होता. मात्र, जेट एअरवेज वर आर्थिक संकट कोसळल्याने नाशिकची विमानसेवाही बंद पडली होती. यानंतर बऱ्याच खासगी कंपन्या नाशिक-दिल्ली स्लॉटसाठी प्रयत्नशील होत्या. परंतु स्पाइसजेटला स्लॉट मिळाल्याने बुधवार (दि.२५) पासून विमानसेवा सुरु झाली आहे. दरम्यान दिल्लीहून ३.२० वाजता एस ५१४ या १४९ आसनी एअरबसने उड्डाण केले, व ओझर विमानतळावर ५.०५ वाजता लँड केले. दरम्यान विमानात ८९ प्रवाशी दिल्लीहून नाशिकला आले. त्यावेळी अर्धा तास थांबा असल्याने सॅनिटायजेशन व इतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून ५.३५ वाजता विमानाने दिल्लीकडे ९२ प्रवाशांना घेऊन भरारी घेतली. मंगळवार, बुधवार, गुरुवार व रविवार ही सेवा सुरु असेल. तसेच दिल्ली-नाशिक प्रवासासाठी ४,०६० रुपये तर, नाशिक-दिल्ली प्रवासासाठी ४,०८७ रुपये तिकीट दर ठेवण्यात आला आहे. विमानसेवेने दिल्ली-नाशिक अंतर केवळ २ तासात पार होते. त्यामुळे नाशिककरांसाठी ही सेवा फायदेशीर ठरणार आहे.