नाशिकला कंपनीकडून कोट्यावधी रुपयांची फसवणूक; आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील नाशिकरोड येथे फ्युचर ट्रेडिंग सोल्युशन कंपनी आहे. या कंपनीमार्फत गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याची तक्रार उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात १ कोटी ५ लाख ७५ हजारांची फसवणूक  झाल्याने आशुतोष पंढरीनाथ आढाव (रा.आर्टिलरी सेंटर रोड) यांनी फिर्याद दाखल केली असून, संशयित अरविंद ग्यानशंकर सिंग (रा. गुलमोहर कॉलनी,आर्टिलरी सेंटर रोड) तसेच राजेशकुमार विजयकुमार सिंग (रा. साईश्रद्धा अपार्टमेंट, लोखंडेमळा, जेलरोड) यांनी गुंतवणूकदारांना जादा पैशाचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपये उकळले. गुंतवणूक करताना संशयितांनी रक्कम स्वीकारल्यावर फिर्यादी तसेच इतर गुंतवणूकदारांना सिक्युरिटी चेक देऊन करारनामादेखील करून घेतला होता.

परंतु त्यानुसार वास्तव्यात काहीही परतावा दिला नाही. तरी आता हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या कंपनीकडून आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेला संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक केदार यांनी केले आहे.