नाशिकमार्गे मुंबईला अवैध गांजाची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक

नाशिक (प्रतिनिधी) : गांजाविक्री करण्यासाठी काही जण स्विफ्ट डिझायर या कारमधून धुळ्याहून नाशिकमार्गे मुंबईला जाणार असल्याची माहिती आडगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांना मिळाली. या माहितीवरून गत शनिवारी (दि.११) दहावा मैल येथे रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक तोडकर, उपनिरीक्षक जितेंद्र माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे आणि इतर हवालदार यांनी मिळून सापळा रचून गुन्हेगारांना अटक केली.

धुळे येथून आलेल्या स्विफ्ट डिझायर (एमएच १८, एजे २१२३) या कारला पोलिसांनी नाशिकमधील दहावा मैल येथे अडविले. त्यानंतर चालक आणि त्यांच्या साथीदारांना विचारपूस करतांना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्याकडून ३२ किलो गांजा, रोकड, चार मोबाईल आणि स्विफ्ट डिझायर कार अशा तब्बल ९ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकार्नाविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.