नाशिकमध्ये गजरे आणि कॅरीबॅग विकणारा निघाला कळंब येथील दरोड्याचा सूत्रधार

नाशिकमध्ये गजरे आणि कॅरीबॅग विकणारा निघाला कळंब येथील दरोड्याचा सूत्रधार

नाशिक (प्रतिनिधी): कळंब तालुक्यात दरोडा टाकून एकाचा निर्घृण खू’न करून फरार झालेल्या मुख्य दरोडेखोराला मुंबईनाका पोलिसांनी शनिवारी (दि. १७) उड्डाणपुलाखाली जेरबंद केले. सुनील नाना काळे (रा. मुंबईनाका सर्कल) असे या संशयित गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५ जून रोजी एका बंगल्यात दरोडा टाकत वॉचमनचा खू’न करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित फरार झाले होते. त्यांचा शोध सुरू असताना कळंब पोलिस ठाण्याचे पथक नाशिक येथे आले होते. कळंब तालुक्यातील काही फिरस्ते नागरिक शहरात गजरे व फुगे विक्री करत असल्याची माहिती दिली होती. पथक माघारी गेल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांनी गजरे विक्री करणाऱ्या सर्व इसमांची माहिती काढली त्यांच्यावर पाळत ठेवली.

यातील एका संशयिताच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याचे निदर्शनास आले. खु’नाच्या गुन्ह्यातील संशयित या नागरिकांमधील एक असल्याची खात्री पटल्यानंतर पथकाने किनारा हॉटेलमागे नंदिनी नदी किनाऱ्यालगतच्या वस्तीत राहणाऱ्या संशयित कुटुंबीयांवर नजर ठेवली. संशयिताला पोलिस आपल्यावर नजर ठेवत असल्याचे समजताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकाने त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता सुनील काळे असे नाव सांगितले तसेच कल्पनानगर (पारधी पेढी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथे कायम वास्तव्य असल्याचे सांगितले. दरोडा टाकून वॉचमनचा खू’न केल्याची कबुली दिली. संशयिताला कळंब पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

नाशिकमध्ये कुठल्याही गुन्ह्यात सहभाग नाही
संशयितांवर नेहमी पाळत ठेवली जात होती. त्यांच्या बारीक हलचालींवर नजर होती. शहरात कुठल्याही गुन्ह्यात त्याचा सहभाग नसल्याचे तपासात आढळले होते. कळंब पाेलिसांनी दिलेल्या वर्णनाच्या आधारे या संशयितावर नजर ठेवत त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने खू’न केल्याची कबुली दिली. त्यास कळंब पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. – विजय ढमाळ, वरिष्ठ निरीक्षक, मुंबई नाका पोलीस ठाणे