नाशिकमध्ये नवीन अनलॉक कसा असेल?

नाशिक (प्रतिनिधी) : अनलॉक-2 मध्ये केलेली अधिसूचना अनलॉक-3 मध्ये सुद्धा सारखीच असेल. अनलॉक-3 च्या आदेशामध्ये फारसे बदल नाहीत. यामध्ये केवळ मॉल संदर्भात तसेच आउटडोअर ऍक्टिव्हिटी संदर्भात काही अटींच्या अधीन राहून परवानगी देण्यात आलेली आहे.
आपल्या जिल्ह्यात कोरोनाची स्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे परंतु अद्यापही धोका पूर्ण टळलेला नाही त्यामुळे काळजी घेणे आवश्यकच आहे, असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हणाले. पालकमंत्री, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, तसेच विविध लोकप्रतिनिधींशी वेळोवेळी झालेल्या चर्चे नुसार नाशिक शहर, मालेगाव शहर व उर्वरित जिल्ह्यात हे आदेश, तसेच या आदेशात नमूद केलेल्या सर्व तरतुदीसह जसेच्या तसे एक ऑगस्ट पासून लागू करण्यात येत आहेत.
थोडक्यात सद्यस्थितीत ज्या पद्धतीने सर्व कामकाज सुरू आहे त्याच पद्धतीने सुरू राहील. फक्त त्यामध्ये मॉल व आउटडोर ऍक्टिव्हिटीची भर पडेल.
कामकाजाची वेळ सकाळी 9 ते 7 या दरम्यान राहील, दुकानांच्या कामकाजा विषयक पूर्वीच्या अधिसुचनेतील निर्देश शासनाने कायम ठेवले असल्यामुळे P1- P2 ही पद्धत देखील कायम राहील. स्थानिक परिस्थितीचा विचार करून स्थानिक पातळीवर घेतलेले निर्णय देखील शासनाने कायम ठेवलेले असल्याने सायंकाळी 7 नंतर नाशिक शहरात लागू करण्यात आलेले संचारावरील निर्बंध देखील तसेच कायम राहतील.

एकीकडे कोरोना विषयक काळजी घेणे व दुसरीकडे अर्थचक्र सुरू ठेवणे याचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न आपण वेळोवेळी करीत आहोत व त्यास योग्य यश देखील मिळत आहे. सद्यस्थितीत जेवढी रुग्ण संख्या वाढते आहे साधारणपणे त्याप्रमाणात रुग्ण बरेही होत आहेत त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येत आहे. नागरिकांनी काळजी घेतल्यास व चांगल्या प्रकारे संयम पाळल्यास आगामी काळात आपण या आपत्तीतून पूर्णपणे बाहेर पडू याची मला खात्री आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.