नाशिकमधील ग्रेप पार्क रिसॉर्ट आणि बोट क्लब पर्यटकांसाठी अखेर सज्ज!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहराची पर्यटनाच्या दृष्टीने सर्वत्र ख्याती आहे. नाशिकला ‘वाईन सिटी’ नावाने ‌देखील संबोधले जाते. म्हणून टुरिझमसाठी देशी आणि विदेशी पर्यटकांमध्ये नाशिकचे आकर्षण दिसून येते. व त्यात आता भर म्हणून ग्रेप पार्क रिसॉर्ट मुळे पर्यटकांच्या मुक्कामाची दर्जेदार सोय होणार आहे. या रिसॉर्टची लक्षणीय बाब म्हणजे नेचर बोट क्लब आहे.

रविवारी (दि.२७) राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने पंचतारांकित ग्रेप पार्क रिसॉर्ट संकुलाचे ई-उद्घाटन करण्यात आले. या पर्यटन संकुलाच्या‌ ई-उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संवाद साधला. यादरम्यान बोट क्लबचा भविष्यात अशा पद्धतीने विकास साधावा की, कोणालाही याकडे बोट दाखवायला जागा राहता कामा नये, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तत्कालीन पर्यटन व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दहा ते पंधरा वर्षांपूर्वी गंगापूर धरणाजवळ बोट क्लबची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यादरम्यान उद्घाटनप्रसंगी सिनेअभिनेता सलमान खान यांना बोलावण्यात आले होते. मात्र, सरकार बदलताच या बोट क्लब प्रकल्पाला फुल स्टॉप लागून अत्याधुनिक बोटी धूळ खात पडल्या आहेत. मात्र आता ग्रेप पार्क रिसॉर्टच्या माध्यमातून नेचर बोट क्लबच्या रूपाने नयनरम्य वातावरणात ४५ एकरात वसलेले हे तारांकित पर्यटन संकुलन पर्यटकांसाठी उच्चदर्जाच्या मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी पुन्हा सुरु झाले आहे.