नाशिककरांनो सावधान : शहरात जबरी चोरीचे प्रमाण वाढले!

नाशिक (प्रतिनिधी) : शहरात लॉकडाऊननंतर सुरु असलेल्या अनलॉक टप्प्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. यामध्ये जबरी चोरीचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. दिवसाढवळ्या बाईकवरून येऊन गळ्यातील सोन्याची साखळी किवा पोत ओढून नेणं किवा जबरदस्ती मोबाईल चोरून घेऊन जाणं हे प्रकार रोज सर्रासपणे होत असल्याचे लक्षात येत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन जरी कमी पडत असेल तर आपण आपली आणि आपल्या वस्तूंची काळजी घेणं आता महत्वाचं झालं आहे.

एकाच दिवसात अनेक चोऱ्यांचे प्रकार होतांना दिसताय. त्र्यंबकरोड परिसरात धारदार कोयत्याचा धाक दाखवून २ मोबाईल आणि रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार घडलाय. त्यानंतर मुंबई नाका हद्दीत वॉक करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील तब्बल ९० हजारांची पोत ओरबाडून पळून नेल्याचा प्रकार घडला आहे. कामटवाडे परिसरात पायी जात असतांना गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर अंबड परिसरात चक्क मारहाण करून चाकूने डोक्यावर वार करत मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यासोबतच मोटारसायकल चोरून पळून जाण्याचे प्रकार सुद्धा उघडकीस येत आहे. त्यामुळे अजून किती दिवस नाशिककरांना आपला जीव मुठीत घेऊन वावरावं लागणारे हाच प्रश्न निर्माण होतोय.