नाशिककरांनो सावधान ; मेनरोडची गर्दी ठरतेय चोरट्यांसाठी सुवर्णसंधी!

नाशिक (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या मेनरोड परिसरात खरेदीसाठी ग्राहकांची कमालीची वर्दळ दिसून येत आहे. आणि याच वर्दळीचा फायदा घेऊन चोरटेसुद्धा हात साफ करून घेत आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या ग्राहकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. आणि संशयित व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ पोलिसांना याबाबत कळवावे असं आवाहन पोलिसांनी केले आहे.

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. वर्षातला सगळ्यात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवाळीसाठी अनेक जण खरेदी करण्यासाठी बाजारात येतात. त्यातच महिलावर्ग तर खरेदीत मग्न होऊन जातात. हीच बाब चोरट्यांसाठी सुवर्णसंधी ठरत असल्याचं चित्र आहे. मेनरोड परिसरात काही अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या पर्समधून ४३ हजार रुपयांचे दागिने लांबवले. तसेच अनेकांची रोकड चोरीला गेल्याच्या तक्रारीसुद्धा रोजच येत आहेत. तसेच मोबाईल हिसकावून नेण्याचे प्रकारसुद्धा समोर आले आहेत. म्हणून सगळ्यांनीच अधिकाधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.