नाशिककरांनो रिक्षाने प्रवास करताय? तर सावधान! ; एकाच दिवसात तीन घटना

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातली वाढती गुन्हेगारी बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाचे अनेक प्रयत्न सुरु असले तरी चोरटे मात्र विविध शक्कल लढवून चोऱ्या करत आहेत. काल (दि.०७) एकाच दिवसात थोड्या थोड्या अंतराने प्रवाशी रिक्षात प्रवासी बसवून त्यांच्याकडचे मोबाईल आणि रक्कम चोरी केल्याच्या तीन घटना समोर आल्या आहेत.

पहिली घटना : विश्वास पावलू अहिरे (४८, रा.पिंपळनेर, सक्री धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गंगापूर रोडपासून निमाणी बसस्थानकात जाण्यासाठी एका प्रवाशी रिक्षात बसले. त्यांच्यासोबत तीन अनोळखी व्यक्ती रिक्षात प्रवास करत होते. त्यांनी विश्वास अहिरे यांची नजर चुकवून शर्टच्या वरच्या खिशातील मोबाईल आणि १६०० रुपयांची रक्कम चोरून नेली.  

दुसरी घटना : मनोहर हनुमंत कावळे (७२, रा.पाटील नगर, नवीन नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयापासून ते सिडको येथे जाण्यासाठी रिक्षात बसले. त्यांच्यासोबतसुद्धा तीन अनोळखी व्यक्ती रिक्षात प्रवास करत होते. चालाकासोबत त्यांनी मनोहर कावळे यांची नजर चुकवून खिशातील अडीच हजार रुपये रोख असलेले पैशांचे पाकीट चोरून नेले.

तिसरी घटना : राजेंद्र खंडेराव देशमुख (३५, रा. देशमुख वस्ती, आडगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते दुपारच्या सुमारास निमाणी बसस्थानकातून आडगाव नका येथे जाण्यासाठी एका रिक्षात बसले. त्यांच्यासोबतही दोन अनोळखी व्यक्ती रिक्षात प्रवास करत होते. त्यांनी राजेंद्र देशमुख यांच्या खिशातील दोन मोबाईल लंपास केले.