नाशिककरांनो… पंचवटी एक्सप्रेसबाबत महत्वाची बातमी..

नाशिक (प्रतिनिधी): नोकरी, व्यवसाय त्याचप्रमाणे शिक्षणासाठी मुंबईला ये जा करणाऱ्या नाशिककरांसाठी महत्वाची असलेली पंचवटी व जनशताब्दी एक्सप्रेस उद्यापासून (दि. २५ जून) सुरु होणार आहे. मुंबई व इतर उपनगरात नोकरी, व्यवसाय तसेच इतर कामासाठी जाण्या येण्यासाठी नाशिककरांची होणारी मोठी गैरसोय आता दूर होणार आहे. पंचवटी व मुंबई जालना जनशताब्दी एक्सप्रेस या दोन गाड्या १ जुलैपासून सुरु होणार होत्या.

मात्र प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता एक आठवडा अगोदरच पंचवटी सुरु होत आहे. गेल्या वर्षी म्हणजेच पहिल्या लॉकडाऊन नंतर पंचवटी १२ सप्टेंबर २०२० रोजी सुरु झाली होती. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे प्रवाशांची संख्या कमी झाली होती. हा तोटा वाढल्याने पंचवटी, नंदीग्राम, तपोवन तसेच जनशताब्दी आदी गाड्या २७ एप्रिलपासून बंद करण्यात आल्या होत्या. सध्या पंचवटी एक्सप्रेस सुरु होत आहे मात्र तिच्या कोचेसची संख्या कमी करण्यात आल्याचे समजते आहे.