नांदूरशिंगोटे बसस्थानकावरून बेपत्ता झालेल्या त्या मायलेकींचा मृतदेह आढळला गोदापात्रात

नाशिक (प्रतिनिधी) : नांदूरशिंगोटे बसस्थानकावरून बेपत्ता झालेल्या मायलेकींचा मृतदेहच गोदापात्रात आढळून आला आहे. 4 जानेवारी रोजी ह्या माय लेकी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली होती. त्यानंतर ‘नाशिक कॉलिंग’ कडून सर्वप्रथम माहिती प्रसारित करण्यात आली होती. तसेच मायलेकींसंदर्भात कुठलीही माहिती मिळाल्यास संपर्कासाठी मोबाईल क्रमांक देखील ‘नाशिक कॉलिंग’च्या पेज वर देण्यात आला होता.

मात्र, आता याच मायलेकींचा मृतदेह गोदापात्रात आढळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ४ जानेवारी रोजी ज्योती राठी (वय २५) व त्यांची मुलगी जिया राठी (वय ३) या मायलेकी नांदूरशिंगोटे बसस्थानकावरून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या परिवाराने वावी पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, ७ जानेवारी रोजी ज्योती यांचा मृतदेह रामवाडी पुलाजवळ गोदापात्रात पाण्यावर तरंगताना दिसून आला. हा मृतदेह फुगून वर आला होता. परंतु, त्यावेळी महिलेची ओळख पटली नव्हती. त्यानंतर, काही दिवसांनी म्हणजेच १४ जानेवारी रोजी जिया राठी हिचा मृतदेह गांधी तलावात आढळून आला. गोदापात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे हा मृतदेह गांधी तलावात वाहत गेला असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या दोघींची ओळख पटली असून, पंचवटी पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.