नांदूरमध्यमेश्वर येथे गोदापात्रातील गाळात पडून २ बिबट्यांचा मृत्यू !

नाशिक (प्रतिनिधी): नांदुरमध्यमेश्वर येथे गोदावरीचे पात्र असून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. दरम्यान, रात्री भक्ष्याच्या शोधात असलेल्या २ बिबट्यांचा यामध्ये पडून, त्यांच्या नाका तोंडात पाणी गेल्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. मृत्यू पावलेल्या बिबट्यांमध्ये दीड वर्षाचा नर तर चार वर्षाची मादी आहे.

रविवारी (दि.१७ जानेवारी) रोजी रात्रीच्या अंधारात भक्ष्याच्या शोधात निघालेल्या नर व मादी बिबट्यांचा गोदापात्रातील साचलेल्या गाळात अडकून मृत्यू झाला. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, या दोघ बिबट्यांनी गाळातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असून, घटनास्थळी पाहणी केली असता ते निदर्शनास आले. परंतु, प्रयत्न करून देखील बिबट्यांच्या जोडीला बाहेर पडता आले नाही व त्यांच्या नाका तोंडात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू झाला. तसेच माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन, दोन्ही बिबट्यांचे मृतदेह गाळातून बाहेर काढले.

त्यानंतर, शवविच्छेदन केले असता दोन्ही बिबट्यांच्या फुफ्फुसामध्ये पाणी गेल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या बिबट्यांच्या मृतदेहावर तारुखेडले येथील रोपवाटिकेत अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.