दुर्दैवी : ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे सिडकोतील तरुणाचा मृत्यू!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकच्या सिडको भागात राहणाऱ्या एका २७ वर्षीय सॉफ्टवेअर डेव्हलपरचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल (दि.२९) सकाळच्या सुमारास घडली. धीरज नानाजी जगता असे या तरुणाचे नाव आहे. महापालिकेच्या भुयारी गटारीच्या कामावेळी भूमिगत वीजतार तुटून त्या विजेचा प्रवाह पाण्यात उतरल्याने धीरज ला शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर आंदोलन करत ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

धीरज हा मुंबईतील एका सॉफ्टवेअर कंपनीत डेव्हलपर होता. लॉकडाऊन पासून तो नाशिकमध्ये घरूनच काम करत होता. काल (दि.२९) सकाळी सात वाजेच्या सुमारास त्याच्या मित्रासोबत वॉक ला गेला असता, या भागात महापालिकेचे भुयारी गटारीचे काम सुरु होते. याठिकाणी भूमिगत वीजतार तुटून वीजप्रवाह पाण्यात उतरला. त्यामुळे धीरजला विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आणि ठेकेदाराच्या दुर्लक्ष केल्यामुळेच या युवकाचा मृत्यू झाला असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.