दुय्यम निबंधक कार्यालयातील कागदपत्रे पुण्यास नेताना गाडीच्या काचा फोडून पळवली

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हाधिकारी कार्यालयातील दुय्यम निबंधक क्रमांक १ च्या कार्यालयातील खरेदी-विक्रीसंबंधातील काही वादग्रस्त व संवेदनशील कागदपत्रे पुणे येथील मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडे (आयजीआर) पाठविताना गाडीच्या काचा फोडून पळविण्यात आल्याची चर्चा आहे. या धक्कादायक प्रकाराची गंभीर दखल घेत पुण्यातील मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाचे पथकच दोन दिवसांपासून नाशिकमध्ये दाखल झाले आहे.

हे ही वाचा:  नाशिक हादरलं! तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून निर्घृण हत्या

त्यांनी दुय्यम निबंधक क्रमांक १ कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केल्याचे समजते. दरम्यान, चोरीस गेलेली ही कागदपत्रे बड्या राजकीय नेत्याच्या मालमत्तेची असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मालमत्तेच्या खरेदी-विक्रीच्या दस्तनोंदणीत अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत पुण्यातील मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडेच तक्रार आली. त्यासंबंधीची कागदपत्रे दुय्यम निबंधक कार्यालयातील लिपिकामार्फत नुकतीच पाठविण्यात आली होती. पुण्याला ही कागदपत्रे नेत असताना ती संबंधित लिपिकाच्या गाडीच्या काचा फोडून पळविल्याची चर्चा आहे. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयात ती सादर झाली नाही. परंतु, संपूर्ण प्रकरणात पहिल्यापासूनच संशयास्पद घडामोडी घडत असल्याने त्याचीच गंभीर दखल मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने घेतली आहे. त्यामुळेच त्यांचे पथक तपासणीसाठी नाशिकला दाखल झाल्याचे सांगण्यात येते. पथकाने उपनिबंधक कार्यालयातील सर्वच कागदपत्रांची तपासणी केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तपासणी दरम्यान उपनिबंधक कार्यालयातील नवीन दस्तनोंदणीचे कामही काहीकाळ बंद असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला; सोमेश्वर धबधब्यात पडून युवतीचा मृत्यू