दुकानातून ३० हजाराचा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी आरोपींना २ वर्ष ६ महिन्याचा कारावास !

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील पंचवटी परिसरात २०१८ मध्ये २ आरोपींनी संगनमत करून मेडिकल दुकानातून चोरी केली होती. या प्रकरणी (दि.६ जानेवारी) रोजी माननीय न्यायालयाकडून आरोपींना २ वर्ष ६ महिन्याचा कारावास व दंड सुनावण्यात आला आहे.

फिर्यादी रवीश विजयकुमार कोहली यांच्या प्रसाद बंगला शॉप क्रमांक १ जानता राजा कॉलनी मखमलाबाद रोड पंचवटी येथे मेडिकल दुकानामध्ये चोरीची घटना घडली. दरम्यान, १४ जुलै २०१८ रोजी रात्री ११ वाजता संशयित हसन हमजा कुट्टी (वय ४०,रा.पंचवटी) व राजकिशोर लक्ष्मीकांत बोराल (रा.गाडगे महाराज पुलाजवळ, गणेशवाडी) या दोघांनी चोरीचा कट रचला. त्यानुसार, संशयितांनी फिर्यादी यांच्या मेडिकल दुकानाचे शटर उचकावुन आत प्रवेश केला. त्यानंतर १८ हजार रोख रक्कम, ६ हजारांचे ९ मोबाईल व ६ हजार किंमतीचा कॉस्मॉटिक माल असा एकूण ३० हजाराचा मुद्देमाल चोरून पोबारा केला.

म्हणून या प्रकरणी पंचवटी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार, गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार आर.एस. घोरपडे यांनी चिकाटीने केला असून, सबळ पुरावे मिळवून, मुख्य न्यायदंडाधिकारी नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्याची सुनावणी ६ जानेवारी २०२१ रोजी झाली असून, दोन्ही आरोपींना प्रत्येकी २ वर्ष ६ महिने कारावास व १ हजार रुपये दंड सुनावण्यात आला आहे.