दिवाळीच्या मुहूर्तावर खाद्यतेल महागले ! वाचा कितीने वाढ झालीये..!

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनामुळे सुरुवातीला सर्वप्रकारच्या खाद्यपदार्थांची आयात काही कालावधीसाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे खाद्यतेलाच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. मात्र, आता सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे खाद्यतेलाच्या किंमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांना फराळ बनवण्यासाठी खाद्यतेलाच्या महागाईचा चटका बसणार आहे.

कोरोनाचा संसर्ग अजूनही थांबलेला नाही. त्यामुळे नाशिककरांकडून तयार फराळ खरेदी करण्यापेक्षा घरीच फराळ बनवण्याला पसंती दिली जात आहे. मात्र, खाद्यतेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे ग्राहकांकडून शेंगदाणा तेलाच्या वापराऐवजी फराळासाठी सोयाबीन तेलाचा वापर करण्यात येत आहे. यामुळे सोयाबीन तेलाच्या मागणीत व किंमतीत देखील वाढ होत आहे. तर दुसऱ्या बाजूला दिवाळीचा सण आला म्हणजे फराळ आलेच, कारण फराळाच्या उत्तम चवीसाठी ग्राहकांकडून  वेगवेगळ्या खाद्यतेलांना प्राधान्य दिले जाते. यामध्ये शेंगदाणा, करडी, सोयाबीन, सूर्यफूल, मोहरी, तीळ अशा खाद्यतेलांची मागणी केली जाते. मात्र, यावर्षी शेंगदाणा तेलाचे दर १ ऑक्टोबरला १४२ होते तर आता नोव्हेंबर मध्ये १४६ झाले आहेत. तसेच सोयाबीन तेल ९४ वरून १०३ वर पोहचले आहे. तर सूर्यफूल तेल ११२ वरून १२३, करडी १३९ वरून १४०, मोहरी १६० वरून १७०, पाम तेल ८५ वरून ९५ वर किंमती पोहचल्या आहेत.