दारू पिऊन दंगा करू नका सांगितले म्हणून….

नाशिक (प्रतिनिधी) : सातपूर परिसरातील भवर मळ्यात काही इसम दारू पिऊन दंगा करत होते. त्यांना शुभम नामदेव भवर (२४ रा. सी-२ प्रियांका व्हिला, पाण्याची टाकी मागे महात्मा नगर) यांनी “दारू पिऊन दंगा करू नका आणि येथून निघून जा” असे सांगितले. याचा राग मनात धरून संशयित आरोपी भूषण आव्हाड, चेतन पवार, तेजस पाटील, जयतु चित्ते, राजेश चव्हाण व इतर चार ते पाच इसम (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांनी मारहाण केली.

याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या दुसऱ्या इसमालादेखील लाकडी दांडक्याने व लोखंडी रॉड ने मारहाण करून जखमी केले. तसेच तक्रारदार व जाब विचारण्यासाठी आलेले इसम हे त्या ठिकाणहून बचावसाठी पळत असताना त्यांच्यावर दगडफेक केली. भांडण सोडवण्यासाठी येत असलेल्या नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वरील सर्व संशयित आरोपींवर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.