दहीपूल परिसरात अज्ञातांनी रखवालदाराचा केला खून

नाशिक(प्रतिनिधी): नाशिक शहरातील वर्दळ असलेला परिसर दहीपूल या ठिकाणी अज्ञातांनी रखवालदाराचा लाकडी दंडुक्याने मारहाण करून खून केल्याचा प्रकार मंगळवारी (दि.२९) रोजी सकाळी उघडकीस आला. खून झालेल्या व्यक्तीचे नाव हिरालाल प्रजापती (वय ३५,रा.माडसांगवी,मूळ रा. नेपाळ) असे असून, भद्रकाली पोलीस ठाण्यात सदर प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहीपुलावरील प्रकाश सुपारी दुकानाच्या समोर भद्रकाली पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी सचिन अहिरे हे गस्त घालत असताना. त्यांना रस्त्यावर एक व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आला. विचारणा केली असता याप्रकरणी एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार काही तरुणांनी या व्यक्तीस लाकडी दांडुक्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच तपासासाठी चार पथके तयार केली असल्याची माहिती पोलिसांकडून पुरवण्यात आली.पोलिसांनी या रस्त्यावरील काही सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दुचाकीवर आलेल्या अज्ञात तरुणांनी हातात दंडुका घेऊन प्रजापती यांचा पाठलाग केल्याचे फुटेजमध्ये  दिसून आले. प्रजापती हा परिसरात ग्रस्त घालण्याचे काम करीत असल्याचा दावा करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.