दरोडा घालण्यासाठी सुरु होती तयारी आणि…

नाशिक (प्रतिनिधी) : सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास भारतनगर परिसरात असलेल्या दर्गेजवळील मोकळ्या प्लॉटमध्ये एक टोळके दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तयारी करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी तैनात असलेल्या पोलिसांना सदर टोळके जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे लक्षात आले. पुढील विचारपूस करतांना दरोडा घालण्याची पूर्वतयारी करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

त्यांच्याकडून कोयता, मिरची पुड, नॉयलॉन दोरी असे घटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे कारवाई करत यातील पाच जणांना ताब्यात घेतले तर दोघे फरार आहे.

समीर मुन्ना शहा (वय २३, रा. भारत नगर, मराठी शाळेमागे), वसिम अब्दुल शेख (वय २३, रा. नंदीनी नगर, वैष्णवी गिरणी जवळ) दीपक पितांबर गायकवाड (वय ३७, रा. विनय नगर, देवी मंदिरामागे), फकीरा रमेश बडे (वय ३१, रा. म्हाडा बिल्डिंग नं.२), किरण खंबाईत उर्फ हुक्का (पत्ता माहित नाही) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात शस्त्र व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन व इतर अधिनियमांन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक रौंदळे तपास करत आहे.