त्या तरुणीचा मारेकरी अखेर सापडला ; धक्कादायक खुलासा

नाशिक (प्रतिनिधी) : तपोवनातल्या रामटेकडी भागात एका अज्ञात तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळून आला होता. अखेर त्या युवतीचा खून झाल्याचा उलगडा झाला आहे. मृत तरुणी ही नाशिकरोडच्या देवळाली भागात राहणारी असून झैनब जाकीर कुरेशी असं तिचं नाव आहे. ती तीन महिन्याची गरोदर असल्याचे पोस्टमार्टम मध्ये निष्पन्न झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दानिश जावेद कुरेशी (२०) हा मृत तरुणीचा नातेवाईक असून झैनब त्याला “तू माझा पती बनून मला दवाखान्यात नेऊन गर्भपात करून दे. नाहीतर मी तुझे नाव घेईल.” अशी धमकी वारंवार देत होती. या गोष्टीला वैतागून आरोपी दानिश कुरेशी याने तिचा खून केल्याची कबुली दानिशने स्वतः दिली. तपोवन मध्ये एक बाबा असून त्याच्याकडच्या औषधाने आणि जडीबुटीने तुझा गर्भपात करून देतो असे सांगून दानिशने झैनबला ५ डिसेंबर २०२० रोजी तपोवनात नेले. तेथे निर्जन स्थळी घेऊन जाऊन तिचा गळा दाबून डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला.