“तुमच्या मुलाला संपवले त्याप्रमाणे तुम्हालादेखील संपवून टाकू” असे म्हणत महिलेला मारहाण

नाशिक (प्रतिनिधी): “आमच्याविरुद्ध खोटी तक्रार का दिली ?” असे म्हणून घरात घुसून महिलेस मारहाण केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडली त्यावेळी संशयित आरोपीच्या हातातील चाकू पाहून परिसरातील लोकांनी घाबरून घराचे दरवाजेही लावून घेतले..

याबाबत सुमित्रा माणिक टाळकुटे (वय ५२, राहणार: फ्लॅट नं.१, शिवनंदा अपार्टमेंट, स्वामीनगर, महादेव मंदिराजवळ, अंबड) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी करण कडुसकर व त्याचे चार साथीदार सुमित्रा यांच्याकडे बघून शिट्टी वाजवू लागले व गाणे म्हणू लागले. सुमित्रा हा प्रकार बघून घाबरल्या व त्यांनी घरात जावून दरवाजा आतून लावून घेतला. त्यावेळी कडुसकर त्यांच्या घरासमोर येऊन “ तुम्ही आमच्याविरुद्ध खोटी तक्रार दिली.” असे म्हणून घराच्या दरवाज्याला लाथा मारून धक्के मारून बळजबरी घरात घुसला व सुमित्रा यांना चाकूचा धाक दाखवून “तुम्ही आमच्यावर खोटा आरोप करून तक्रार दिली आहे. आम्ही कुणाला घाबरत नाही. जसे तुमच्या मुलाला संपवले त्याप्रमाणे तुम्हालादेखील संपवून टाकू” अशी धमकी दिली. त्यानंतर सुमित्रा यांच्या पतीला देखील मारहाण केली. यावेळी सुमित्रा यांची मुलगी आशा मध्ये पडली असता तिला ढकलून देऊन ठार मारण्याची धमकी दिली. कडूस्कर याच्या हातातील चाकू बघून सुमित्रा यांच्या परिसरातील काही लोकांनी घाबरून स्वत:च्या घराचे दरवाजे लावून घेतले. याप्रकरणी करण कडुसकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.