तरुणाईत आत्महत्येचे वाढते प्रमाण: शहरात दोन मुलींनी केली आत्महत्या !

नाशिक (प्रतिनिधी) : शहरात आत्महत्यांच्या घटना वाढत असून, यामध्ये तरुण वर्गाचा जास्त समावेश आहे. त्यानुसार, लेखानगर परिसरात एका २० वर्षीय मुलीने आत्महत्या केली. तर, माडसांगवीमध्ये एका अल्पवयीन मुलीने गळफास घेत, जीवन संपवले.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (३० डिसेंबर) रोजी सकाळी लेखानगर परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या ज्योती गणेश गायकवाड (वय २०) या तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवले. ज्योतीने अज्ञात कारणावरून, राहत्या घरी छताच्या लोखंडी पाईपला साडी बांधून गळफास घेतला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरी घटना माडसांगवीमधील आडगाव शिवारातील म्हसोबावाडीत राहत असलेल्या सुनीता सुरेश दिवे (वय १७) हिने आत्महत्या केल्याची आहे. सुनीताने झाडाला ओढणी बांधून गळफास घेत, जीवन संपवले. सुनीताच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.