डेटिंग अँपद्वारे मैत्री करून युवतींवर अत्याचार करणाऱ्याला अटक

नाशिक (प्रतिनिधी): सोशल मिडिया तसेच डेटिंग अँपच्या माध्यमातून विवाहित महिला आणि युवतींसोबत मैत्री करत त्यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा बनाव करत तसेच लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मुरबाडमधून इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी बलात्कार, विनयभंगाचे गुन्हे दाखल असल्याची बाब समोर आली आहे.

इंदिरानगर परिसरातून दोन महिन्यांपूर्वी एक युवती बेपत्ता झाली असल्याची तक्रार तिच्या पालकांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात केली होती. तेव्हापासून पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा शोध सुरु होता. या युवतीचा शेअर चॅट एप्लिकेशनद्वारे एका व्यक्तीशी संपर्क झाल्याचे लक्षात आले. संशयित आरोपी वैभव लक्ष्मण पाटील (रा. मुरळी, ता. पाटण, जि. सातारा) याच्यासोबत घरातून डिसेंबर महिन्यात गेल्याची माहिती समजली. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पथक सातत्याने पाटीलच्या मागावर होते. मुरबाड, ठाणे, सातारा आणि महाड या शहरांमध्ये त्याचा शोध सुरु होता.

मुरबाडमधून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने तिथे सापळा रचला आणि त्याला शिताफीने अटक केली. तसेच त्याच्या तावडीतून युवतीचीही सुटका करण्यात आली. पाटील याच्यावर यापूर्वी बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.