डेंग्यू, चिकुनगुन्या रुग्णांचे अहवाल महापालिकेला पाठविण्याची खासगी लॅबला सक्ती

डेंग्यू, चिकुनगुन्या रुग्णांचे अहवाल पाठविण्याची खासगी लॅबला सक्ती

नाशिक (प्रतिनिधी): महापालिकेच्या रेकॉर्डवर डेंग्यू आणि चिकुनगुन्याची रुग्णसंख्या कमी दिसत असून प्रत्यक्षात खासगी लॅबकडून पुरेशी माहिती दिली जात नसल्याने दोन्ही आजारांशी संबंधित रुग्णांची लपवाछपवी होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर आयुक्त कैलास जाधव यांनी डेंग्यू व चिकुनगुन्याच्या प्रत्येक रुग्णाची माहिती महापालिकेला कळविण्याबाबत खासगी लॅबचालकांवर बंधन घातले आहे. यानिमित्ताने खरोखरच डेंग्यू व चिकुनगुन्याच्या रुग्णांचे योग्य पद्धतीने निदान होते की नाही हेदेखील समोर येणार आहे.

कोरोनाची तिसरी लाट तोंडावर असल्याचा दावा केला जात असताना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, चिकुनगुन्या यांसारख्या कीटकजन्य आजारांनी डोके वर काढल्यामुळे नाशिककरांची धाकधूक वाढली आहे. या दोन्ही आजारांची लक्षणे तीव्र स्वरूपाची असून कमालीचा अशक्तपणा येणे, अंगाला सूज येणे, ताप, अंगदुखीमुळे रुग्ण बेजार होत आहे.

सर्वसाधारणपणे पावसाच्या पाण्याची डबकी साचल्याने तसेच घरात किंवा परिसरात अनावश्यकरित्या साचलेल्या पाण्यामुळे या दोन्ही आजारांशी संबंधित विषाणूंचा प्रादुर्भाव करणाऱ्या डासांची उत्पत्ती होते. पंधरवड्यापूर्वी सिडको, सातपूर भागात डेंग्यू, चिकुनगुन्याचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळले.

त्यानंतर महापालिकेने साथरोग नियंत्रण पथके पाठवून रुग्णांची तपासणी करणे तसेच डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे अशी मोहीम राबवली. मात्र शहरातील अन्य भागात अशा मोहिमा केवळ कागदोपत्री राबवल्या जात असल्यामुळे किंबहुना औषध व धूर फवारणी कागदोपत्री होत असल्यामुळे डेंग्यू व चिकुनगुन्याचे रुग्ण वाढत आहे. जुलैच्या गेल्या महिनाभरातच डेंग्यू १५६ तर चिकुनगुन्याचे १३३ नवे बाधित आढळले आहेत. विशेष म्हणजे ही आकडेवारी महापालिकेच्या रेकॉर्डवरील असून प्रत्यक्षात रुग्णसंख्या मोठी असल्यामुळे आता खासगी रुग्णालयांमधील नेमके रुग्ण किती हे शोधण्याचा पालिका प्रयत्न करत आहेत.

या पार्श्वभूमीवर आयुक्त जाधव यांच्याशी चर्चा केली असता शहरातील खासगी लॅब चालकांना डेंग्यू, चिकुनगुन्या तपासणी अहवाल महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला कळविणे बंधनकारक केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. यापूर्वी पालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या काळात अचूक रुग्णसंख्या शोधण्यासाठी खासगी लॅबमधील अहवालांचे नमुने पालिकेला पाठवण्याचे बंधन घालून देण्यात आले होते.
नाशिक जिल्ह्यातील दुकानांच्या वेळा आणि इतर निर्बंधांबाबत अतिशय महत्वाची बातमी…