जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी समन्वय कक्ष स्थापन!

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध धंदे आणि तक्रारींच्या अनुषंगाने नागरिकांसाठी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या या समन्वय कक्षाचा क्रमांक ०९४०५८६९९४० हा असून ई-मेल आय डी nashikhb123@gmail.com हा आहे. दिलेल्या क्रमांकावर केवळ अवैध धंद्यांच्याच तक्रारी स्वीकारल्या जाणार आहे. नागरिकांना जिल्ह्यात काही अवैध घटना घडत असल्याची माहिती मिळाल्यास त्यांनी याबाबत दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा. तक्रार करताना घटना कोठे?  कधी? काय? याचा तपशील द्यावा, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी मांढरे यांनी केलेले आहे.

जिल्ह्यातील अवैध धंदे बंद होण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनातील सर्व विभागांची नुकतीच समन्वय बैठक पार पडली होती. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून या समन्वय कक्षमार्फत सर्व विभागांमध्ये समन्वय साधला जाणार आहे.

या कक्षाचे प्रमुख समनव्यक म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी भागवत डोईफोडे असतील. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार, सहायक पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधिक्षक बिसन भूतकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक के.एम.वीरकर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत हेमाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, अन्न व औषध निरीक्षक चंद्रकांत मोरे, अमित रासकर हे या समन्वय कक्षाचे सदस्य असणार आहेत.

या कक्षात नागरिकांकडून आलेल्या केवळ अवैध धंद्यांबाबतच्याच तक्रारी नोंदवले जातील आणि संबंधित विभागाच्या ई-मेलवर तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार तात्काळ कार्यवाहीसाठी पाठविली जाईल. संबंधित विभाग दिलेल्या काळात त्या तक्रारींवर कार्यवाही करून समन्वय कक्षाच्या ई मेल वर कार्यपूर्ती अहवाल पाठवतील. असे देखील यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी कळविले आहे.