चक्क साड्यांच्या बॉक्समधून सुरु होती गुटख्याची वाहतूक.. दोन जण अटकेत !

चक्क साड्यांच्या बॉक्समधून सुरु होती गुटख्याची वाहतूक.. दोन जण अटकेत !

नाशिक (प्रतिनिधी): साड्यांच्या बॉक्समध्ये गुटखा वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला. ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ-बलसाडरोडवरील एका पेट्रोलपंपासमोर एका ट्रकमध्ये साडीच्या बॉक्समध्ये गुटखा आढळून आला. पोलिसांनी संशयित ट्रकचालक सुभाष नारायण पालवे (रा. देवराई, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), शिवाजी रामू कराड (रा. अहमदनगर) या दोघांना अटक केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुजरातहून येणाऱ्या ट्रकमध्ये गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. पेठ पोलिसांना याबाबत कारवाई करण्याचे आणि संशयित वाहन तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. रात्री दोन वाजता संशयित ट्रक (एमएच १६ सीसी २८४२) हा पेठ-बलसाडरोडवरील एका पेट्रोलपंपासमोर उभा असलेला दिसला.

पथकाने ट्रकचालकाला गाडीत असलेल्या मालाबाबत विचारणा केली. गाडीत नवीन साड्या विक्री करण्यासाठी अहमदनगर येथे जात असल्याचे सांगितले. पथकाने बॉक्सची तपासणी केली. काही बॉक्समध्ये साड्या आढळून आल्या. मात्र, पथकाने सर्वच बॅाक्स फोडून पाहिले असता त्यात साडीच्या आड गुटख्याची पाकिटे आढळून आले. तब्बल ३८ लाख १९ हजारांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला.

संशयितांच्या विरोधात पेठ पोलिस ठाण्यात फसवणूक, अन्नसुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहायक निरीक्षक संदीप वसावे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे नाशिक व नगर जिल्ह्यातील गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिकमध्ये शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; रॅगिंग होत असल्याचा कुटुंबियांचा आरोप
बायोडिझेल पंपावर छापा; माजी आमदाराचा भाऊ चालवत होता हा पंप!
नाशिकमध्ये तरुणाच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या मित्रांवर खु’नाचा गुन्हा