घरात शिरला बिबट्या; आजोबांनी प्रसंगावधान दाखवल्याने बिबट्या जेरबंद !

नाशिक (प्रतिनिधी) : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव भटाटा येथील गांगडवाडी मळ्यात अचानक वस्तीत बिबट्या शिरला. दरम्यान, कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या घरात गेला. त्यावेळी प्रसंगावधान दाखवत आजोबांनी बाहेरून घराची कडी लावली.

मंगळवारी (दि.५ जानेवारी) रोजी दुपारी गोंविंद बचू हिंदोळे हे घरातील सगळे बाहेर गेलेले असल्याने  एकटेच त्यांच्या घराच्या अंगणात बसले होते. दरम्यान, कुत्र्याच्या मागे २ वर्षाचा बिबट्या जोरात पळत सुटला. बिबट्यापासून वाचण्यासाठी कुत्रा घरात शिरला तर, त्याच्यामागे बिबट्याही घरात शिरला. मात्र, कुत्रा पाळीव असल्याने त्याला घराचे मागचे, पुढचे दार परिचित होते. त्यामुळे कुत्रा सहज बिबट्याला चकमा देऊन मागच्या दाराने बाहेर पडला. परंतु बिबट्या कुत्र्याच्या शोधात घरातच घुटमळला. तर, बिबट्या घरातच मोठमोठया भांड्याच्या आत जाऊन बसला. एवढ्यात हिंदोळे यांनी प्रसंगावधान दाखवत आवाज न करता घराचा दरवाजा बाहेरून लावून घेतला. दरम्यान, त्यांनी शेजाऱ्यांना कळवले व पोलीसपाटील यांनी वनविभागाला याची माहिती दिली.

हे ही वाचा:  Breaking: तुळजापूर- सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात सिन्नरच्या तिघा तरुणांचा मृत्यू

त्यानंतर, वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या पथकाने अंधार झाल्याने बिबट्या दिसत नव्हता म्हणून, घराच्या मागच्या दाराला पिंजरा लावला. तसेच, फटाके लावल्याने बिबट्या बिथरला व दाराला लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. तर, आजोबांच्या प्रसंगावधानामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.