गरजू आणि संकटात सापडलेल्यांना मदत करून साजरी करा दिवाळी – जिल्हाधिकारी मांढरे

नाशिक (प्रतिनिधी): गेल्या सहा सात महिन्यापासून आपण करोनाशी केलेल्या संघर्षाची फळे आता दिसू लागली आहेत,पण आता आपल्याला त्यात सातत्य टिकविणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नाशिककरांनी दिवाळी सण साजरा करताना काळजी घ्यावी, केवळ फटाके म्हणजे दिवाळी नसून करोनामुळे ज्यांच्यावर संकट कोसळले आहे अशांना धीर देण्याचा प्रयत्न करणे व गरजू आणि संकटात सापडलेल्यांना मदत करून  नात्यांची वीण घट्ट करण्याचे   आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देताना ते म्हणाले, गेल्या काही महिन्यांत लॉकडाउनमुळे अनेकांना वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. अनेक कुटुंबांवर मानसिक, आर्थिक संकंट कोसळले, त्या सर्वांना धीर देणे गरजेचे आहे. करोनाच्या काळातील क्वारंटाइन असताना अनेकांना मानसिक आधार शोधावा लागला. अनेकांचा रोजगार गेला, बहुतेकांवर आर्थिक संकट कोसळले. त्यामुळे सर्व नाशिककरांनी ही दिवाळी गरजू आणि संकटात सापडलेल्यांना मदत करून साजरी करावी. केवळ फटाके फोडून उत्सव साजरा करण्यापेक्षा एकमेकांना सहाय्य करून त्यांना आनंदात सामावून घेणे महत्त्वाचे असल्याचेही जिल्हाधिकारी  मांढरे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ही दिवाळी साजरी करताना प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. करोनाच्या संभाव्य लाटेला रोखण्यासाठी सगळयांनी मिळून एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केले आहे.