गंभीर आजाराशी लढणाऱ्या नाशिकच्या राजाभाऊ बोडकेंना गरज आहे तुमच्या आर्थिक मदतीची…

गंभीर आजाराशी लढणाऱ्या नाशिकच्या राजाभाऊ बोडकेंना गरज आहे तुमच्या आर्थिक मदतीची…

नाशिक (प्रतिनिधी): गेल्या आठ वर्षांपासून एका गंभीर आजाराशी मोठ्या धैर्याने लढा देणार्‍या सिडकोतील  ‘राजाभाऊ’ म्हणून सुपरिचित असणार्‍या राजेंद्र बोडके यांच्या जखमांवर कोणी फुंकर घालणार का? अशी आर्त हाक त्यांच्या कुटुंबीयांनी घातली आहे.

अत्यंत दुर्मिळ आणि खर्चिक आजारावर मात करण्यासाठी बोडके कुटुंबीयांनी आजपर्यंत  20 लाख रुपयांहून अधिक खर्च केला. मात्र आता त्यांचे वेतनही बंद केल्याने हा खर्च त्यांना पेलवत नसल्याने दानशूर व्यक्ती, संस्था आणि नागरिकांकडून औषधोपचारासाठी मदतीचे आवाहन त्यांनी केले आहे.

सिडकोतील राणाप्रताप चौक येथील रहिवासी असलेले राजेंद्र बोडके हे पंचायत समितीचे कर्मचारी असून, त्यांना सन 2013 पासून ’हिड्राडेनिटिस सुपराटिव्हा’ या त्वचेच्या गंभीर आजाराने ग्रासले आहे. आधी बरेच दिवस या आजाराचे गांभीर्य लक्षात आले नाही. जेव्हा लक्षात आले तेव्हा या आजाराने गंभीर रूप धारण केले होते.

आता तर दोन वर्षांपासून या आजाराचा गंभीर त्रास सहन करावा लागत आहे. रजा संपल्यामुळे जिल्हा परिषदेने वेतनही दोन वर्षांपासून बंद केले आहे. दोन वर्षांत 20 लाखांहून अधिक खर्च झाला असून, यापुढील काळातही उपचाराकरीता 20 ते 25 लाखांची गरज असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. दानशुरांनी सढळ हाताने मदत करावी, अशी विनंती रूग्ण राजेंद्र बोडके व त्यांच्या परिवारातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक मेसेज तयार केला असून, मदतीची याचना केली आहे

लाखात एखाद्याला लागण:
हा एक दुर्मिळ आजार असून, एक लाख लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीला हा गंभीर आजार होत असल्याचे मत वैद्यकीय अधिकारी व त्वचारोग तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या गंभीर आजारावर बोडके यांनी आतापर्यंत मुंबई, वापी गुजरात व नाशिक येथील 10 ते 12 डॉक्टरांकडे उपचार घेतले आहेत. अद्याप अपेक्षित असा फरक पडलेला नाही.

दिवसाला दोन हजार रुपये खर्च:
राजेंद्र बोडके यांना या आजारात शरीराच्या काही मुख्य भागांवर गंभीर जखमा झालेल्या आहेत. या जखमा दररोज स्वच्छ कराव्या लागतात आणि मलमपट्टी करावी लागते. केवळ मलमपट्टीसाठीच दररोज 1 हजार रुपये खर्च लागतो आणि अन्य गोळ्या-औषधांना 1 हजार असा सुमारे 2 हजार रुपये दररोज खर्च लागतो.

अद्याप फरक नाही:
आजार बरा होईल या आशेपोटी बोडके यांनी आतापर्यंत अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी अशा सर्वच प्रकारचे उपचार घेतले आहेत. नाशिकमधील सुजाता बिर्ला हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर, त्वचारोगतज्ञ डॉ.अनिल गुगळे, डॉ.सुनील वर्तक, डॉ. सदानंद नायक, डॉ.मिलिंद देशमुख, डॉ. संजय पिचा तसेच होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. मुसळे यांच्याकडे उपचार घेतले आहेत. सध्या ते आडगाव येथील मविप्र रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत.

राजेंद्र बोडके यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असून, 30112543415 हा खाते नंबर तर SBIN0011803 हा IFSC कोड आहे. 9011682484 या मोबाईल क्रमांकावर फोन पे आणि गुगल पे देखील करता येईल. दानशुरांनी वाटल्यास व्हिडिओ कॉल करून आजारासंदर्भात खात्री करावी नंतरच अर्थिक मदत करावी, असे आवाहन रूग्ण राजेंद्र बोडके (9011682484) आणि रूग्णाची आई मंदाकिनी बोडके (8275015692) यांनी केले आहे.