गंगापूर रोड: दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात युवक जागीच ठार

नाशिक (प्रतिनिधी): भरधाव वेगात जाणारी दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात युवक जागीच ठार झाला. गंगापूररोडवर रविवारी (दि. ४) सकाळी ८ वाजता नवश्या गणपती मंदिराजवळ हा अपघात घडला. अदित्य सचिन वाघ (१७, रा. सातपूर) असे या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अदित्य वाघ आणि त्याचा मित्र दुचाकीने (एमएच १५ एचबी ७७९५) गंगापूररोडने नवश्या गणपतीकडे जात असताना दुचाकीवरील नियत्रंण सुटल्याने दुचाकी झाडावर जाऊन आदळली. यात अदित्यच्या डोक्यास गंभीर मार लागून तो जागीच ठार झाला. पाठीमागे बसलेला त्याचा मित्र जखमी झाला. दुसऱ्या अपघातात औरंगाबाद रोडने दुचाकीने जाणारे राकेश राजेंद्र बनकर यांचे ओढा गावाजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकावर आदळली. डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आडगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.