गंगापूर रोड: आनंदवलीत वृद्धाचा गळा चिरून खून

नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर रोड येथील आनंदवली येथे एका वृद्धाचा गळा चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.१७) सायंकाळी उघडकीस आला.

रमेश मंडलिक (वय ७५) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. संशयितांच्या शोधासाठी गंगापूर पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आनंदवली शिवारातील मंडलिक मळा येथील राहणारे रमेश मंडलिक हे दुपारी शेतात विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. अनोळखी व्यक्तींनी मंडलिक यांना मारहाण केली.

यातील एकाने चाकूने त्यांच्या गळ्यावर वार करून गळा चिरला. यामध्ये मंडलीक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे मंडलीक यांच्यां कुटूंबियांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. गंगापूर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले असता काही अंतरावर माग काढला. मात्र पुढे संशयित वाहनातून फरार झाले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली.